"डॉक्टर माझा एक दात फार पूर्वी काढून टाकलाय. आता नवीन दात लावायचा आहे. लावू शकतो का?" कंसल्टेशन रूम मध्ये येता येताच एकाने प्रश्न विचारला.
असा प्रश्न आला की त्याचं उत्तर देता देता व्याख्यान दिल्यासारखं लांबलचक भाषणंच तयार होते. आज डेंटिस्ट्री मध्ये रोज नवे नवे प्रयोग चालू आहेत. खोटे दात किंवा कॅप यामध्ये देखील खूप प्रकार आपल्याला पाहायला मिळतात.
कुठला दात लावायचा आहे, पेशंट वय , आजूबाजूच्या दातांची आणि हिरडी ची स्थिती यावर कोणत्या प्रकारचा दात किंवा कॅप पेशंटला देऊ शकतो हे ठरते. या लेखामध्ये मी फक्त ज्यांचे थोडेच दात पडलेले आहेत किंवा काही कारणास्तव काढून टाकावे लागले आहेत ते कोणत्या प्रकारचे दात लावू शकतात यावर लिहिणार आहे.
खोटे दात किंवा कॅप बसवताना त्याचे तीन प्रकार पडतात.
१) इम्प्लांट- सगळ्यात आधुनिक अशी ही खोटा दात बसवायची प्रक्रिया आहे. हा प्रकार 'फिक्स दात' यामध्ये मोडतो .इम्प्लांट हा साधारणतः स्क्रू सारखा दिसतो.
जिथे खोटा दात लावायचा आहे तिथल्या हाडाचा प्रकार, हाडाची लांबी रुंदी, तेथे आजूबाजूला असलेले मज्जातंतू, रक्तवाहिन्या याचा सगळ्यांचा अंदाज घेऊन कोणता इम्प्लांट तिथे व्यवस्थित बसू शकेल हे ठरवले जाते. एक लहानशी प्रोसिजर करून इम्प्लांट हाडांमध्ये बसवला जातो.
यानंतर इम्प्लांट हाडांमध्ये घट्ट बसेपर्यंत म्हणजेच साधारणतः 20 ते 35 दिवस पेशंटला थांबायला सांगितले जाते. हा कालावधी पेशंटचे वय, हाडांची घनता, तिथे होणारे इन्फेक्शन चा प्रमाण यावर अवलंबून असते. तरुण पेशंटची रिकवरी म्हाताऱ्या पेशंट पेक्षा जास्त चांगली असते. ऑस्टियोपोरोसिस यासारखा आजार असणाऱ्या पेशंटला थोडा जास्त वेळ लागू शकतो. इम्प्लांट घट्ट झाल्यावर
या इम्प्लांट वरती दातासारखा दिसणारी कॅप बसवली जाते. एका वेळेस एकापेक्षा अधिक इम्प्लांट आपण बसवू शकतो.
२) ब्रिज किंवा कॅप- कॅप लावणे किंवा ब्रिज बसवणे ही सुद्धा फिक्स दात लावायची एक पद्धत आहे. यामध्ये जो दात नाही आहे किंवा बसवायचा आहे त्याच्या आजूबाजूच्या दाताचा आधार घेऊन नसलेला दात बसवला जातो.
ब्रिज बसवताना आजूबाजूच्या दातांना सुद्धा कॅप बसवावी लागते. कॅप बसवण्यासाठी आजूबाजूच्या दातांना घासून लहान करतात.
या छोट्या झालेल्या दातांवर डेंटल ब्रिज बसवला जातो.
यामध्ये दातांचे खूप प्रकार येतात. आपल्या आवडीनुसार आपण दात बसवू शकतो.
३) रिमुवेबल पार्शियल डेंचर- रेमुवेबल पार्शियल डेंचर म्हणजे काढ घाल करायचे दात. यालाच कवळी असेही म्हणतात.
यामध्ये जे दात बसवायचे आहेत ते फिक्स नसून रोज रात्री काढून पाण्यात ठेवावे लागतात. काढ घाल करायचे दात किंवा कवळी बसवायला आजूबाजूच्या दातांना लहान करायची आणि त्यांचा आधार घ्यायची गरज नसते. हे दात हिरडीवर ठेवले जातात.
अशा प्रकारच्या काढ घाल करणाऱ्या दातांमध्ये देखील बरेच प्रकार येतात. आपल्या आवडीनुसार आपण या दातांचं मटेरियल निवडू शकतो.
या सगळ्या प्रकारा मधले कोणतेही दात निवडले तरीही त्यांचं प्राथमिक कार्य चावणे आणि अन्न बारीक करणे हेच आहे आणि त्यानुसारच त्यांना बनवले जाते.
तोंडात एखादा किंवा एकापेक्षा अधिक दात नसल्यास ते बसवून घेणेच चांगले असते. यामुळे चर्वण प्रक्रिया जास्त चांगली होते आणि तब्येत चांगले राहते.
आशा करते तुम्हाला या लेखातून दिलेले माहिती आवडेल. हा लेख कसा वाटला ते जरुर कळवा. अशीच दातांशी संबंधित अधिक माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये लिहून कळवा. मस्त खा आणि स्वस्थ राहा.
स्मितल नितीन पवार
उज्वल दातांचा दवाखाना
नाशिक
फोन नं. 8421755997


















