बुधवार, ३ जून, २०२०

अक्कलदाढ...तुझी अक्कल अजून आलीच नाहीये का????

      दिवस... रोजच्या प्रमाणेच...
       वेळ... सकाळची... 
       मी क्लिनिक मध्ये....
     १का पेशंट ची ट्रीटमेंट चालू होती. बाहेर एका पन्नाशीच्या व्यक्तीच्या येरझारा चालू होत्या. चालू पेशंट ची ट्रीटमेंट संपल्यावर त्यांना आत घेतलं. त्या व्यक्तीच्या सौ चे चेक अप होते. त्या थोड्या लाजत च डेंटल चेअर वर येऊन बसल्या.
          पेशंट कडे बघताच उत्तरादाखल ते म्हणाले ,"आमची ही २ दिवसापासून दात दुखवते. बघा जरा काय आहे ते."
           "अच्छा." पेशंट कडे वळत मी बोलली.
            पेशंट ची अक्कलदाढ हिरडीतून वर यायचा प्रयत्न करत होती पण जबड्यात तर त्या दातासाठी जागा नव्हती.
            "अक्कलदाढ येतेय तुमची म्हणून त्रास होतोय तुम्हाला." 
            माझ्या तोंडून हे ऐकताच पेशंट बरोबर आलेले जोरात हसले आणि पेशंट कडे बघत बोलले,"अजून अक्कलदाढ आली नाहीये का हिला. म्हणजे अक्कल पण बाकीचं असेल ना यायची?? बरोबर आहे."
             जोक ऐकून पेशंट ला मात्र ओशाळल्या सारखं झालं.
             "आत्ता एवढ्या लेट कशी काय दाढ आली?" जवळपास सगळ्याच अक्कलदाढ दुखणाऱ्या पेशंट चा हा प्रश्न असतो.
             अक्कलदाढ म्हणजेच जबड्यात असणारी तिसरी आणि शेवटची दाढ. ती वयाच्या १८ व्या वर्षांपासून नंतर कधीही येऊ शकते. ही दाढ येताना सगळ्यांनाच त्रास होतो का तर याचं उत्तर आहे नाही. दातांची पोझिशन म्हणजे दात सरळ वर येतोय की वाकडा आहे ,जबड्यात त्या दाताला लागेल एवढी जागा आहे की नाही यावर अवलंबून आहे की दात येताना किती त्रास होईल.
        यावर इलाज आहे का? 
        अक्कलदाढ उशिरा येणे ही नैसर्गिक गोष्ट आहे.   शक्यतो यावर काहीच इलाज करण्याची गरज नाही. मात्र काही वेळा  दाताच दुखणं जास्त असल्यास आपल्याला मेडिसिन घ्यावे लागतात. गोळ्या औषध घेतल्यास थोड्या अवधीसाठी आराम मिळतो. पण परत त्रास झाल्यास पुन्हा मेडीसिन घेणे जरुरी आहे.कधी कधी गोळ्या घेऊन सुद्धा फरक पडत नाही अशा वेळेस छोटीशी प्रोसिजर करून दातावरची हिरडी बाजूला केली जाते आणि दाताला बाहेर यायला जागा करून देतात. दाढ तिरपी येत असल्यास पेशंट ला होणारा त्रास खूप असतो. अशी दाढ बाहेर पण येत नाही आणि पेशंट चा त्रास कमी पण होत नाही. या कंडीशन मध्ये दात काढून टाकण्याचा सल्ला दिला जातो.

        अक्कलदाढ येत असल्यास तोंड उघडायला त्रास का होतो?
       अक्कलदाढ सगळ्यात शेवटची दाढ असल्यामुळे तोंड उघडण्यासाठी लागणाऱ्या स्नायूंच्या जवळ असते. दाताच्या आजूबाजूच्या हिरडीला इन्फेक्शन झाल्यास तिथल्या स्नायूंना ही त्रास होतो. आणि तोंड उघडण्यासाठी त्रास होतो.
     अक्कलदाढ काढण्यासाठी ऑपरेशन करावे लागते का?
     दात जबड्यात वर आलेला असेल आणि पकडण्यासाठी जागा असेल तर ऑपरेशन ची गरज सहसा पडत नाही पण काही दात हाडात अडकलेले असतात त्यांना काढायला छोटीशी सर्जरी करायला लागू शकते.
      ऑपरेशन झालं तर टाके येतात का?
      हो. सर्जरी करून दात काढला तर टाके द्यावे लागतात आणि आठवडा भराने ते काढायला परत क्लिनिक ला जावे लागते.
     अक्कलदाढ काढल्यावर जेवण किती दिवस बंद करावे लागते.?
      पातळ केलेले जेवण दुसऱ्या दिवशी पासून तुम्ही खाऊ शकता.
      अक्कलदाढ काढल्यावर तिथे दुसरा दात बसवावा लागतो का?
       शक्यतो नाही.
       अक्कलदाढ येताना तिला जागा नसल्यास ती बाजूच्या दातांना ढकलून, सरकऊन वर येत असते. त्यामुळे दुसऱ्या दातांची जागाही काही वेळेस बदलते. अक्कलदाढ तिरपी किंवा वाकडी आल्यास त्याच्या आजूबाजूला अन्नकण अडकतात. यामुळे ती दाढ आणि त्याच्या बाजूचे दात ही किडू शकतात.
      म्हणूनच अक्कलदाढ ची काळजी घ्या आणि काही शंका असल्यास डॉक्टरांना दाखावा.
      बाकी या माझ्या पेशंट नी मात्र दाढ काढून घेतली.......

   


.   हा लेख कसा वाटला आणि काही प्रश्न किंवा सजेशन असल्यास कमेंट करून जरूर कळवा.

डॉ. स्मितल नितीन पवार.

उज्ज्वल दातांचा दवाखाना

नाशिक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please do not enter irrelevant comment.