शनिवार, ६ जून, २०२०

दात कसे घासावेत??

  १)दात केव्हा आणि किती वेळा घासावेत?     
   २) दात कसे घासावेत?
   ३) टूथ ब्रश आणि टूथपेस्ट कोणते वापरावे?
    ४) टूथब्रश आणि टूथपेस्ट कधी बदलावे?
   ५) ब्रश करताना दातातून रक्त येतं असं का?
   अश्या खूप साऱ्या प्रश्नांवर आज आपण बोलणार आहोत.
     माफ करा आज मी कोणतीही प्रस्तावना दिली नाही. थेट प्रश्नांना हात घातला. विषयच तसा आहे. माझ्या आवडीचा आणि तुमच्या कुतूहलाचा. मग चालू करूया का एक एक प्रश्न??
         १)दात केव्हा आणि किती वेळा घासावेत?
          दात एकदा सकाळी उठल्यावर आणि एकदा रात्री झोपताना घासावेत. दोन वेळा शक्य नसल्यास एकदा आणि  शक्यतो रात्री झोपताना घासावेत. आपण दिवसभर खूप काही खातो. ते दातात अडकते परंतु बोलतोही खूप आणि पाणीही पितो. त्यामुळे जीभ सतत तोंडामध्ये फिरत राहते आणि त्यामुळे अडकलेले अन्नकण निघून जातात. रात्री झोपल्यावर मात्र ही क्रिया होत नाही. परिणामी अडकलेले अन्नकण तिथेच कुजतात. यामुळे तोंडाचा वास येतो आणि दातांना कीड लागायची शक्यता वाढते.

         २) दात कसे घासावेत?
          दात घासताना टूथब्रश वर मटारच्या दाण्याच्या आकाराची टूथपेस्ट घ्यावी. ब्रश वर खाली अथवा गोलाकार फिरवावा. दात घासताना जोर लावून घासू नये. याने दाताच्या वरचं आवरण निघून जाते आणि थंड खाल्यावर दातांना ठणक बसते. लिहिताना किंवा चित्र रंगवताना पेंट ब्रश वर जेव्हढा दाब देतो तेव्हढाच दाब ब्रशिंग करताना द्यावा. ब्रश च्या ब्रिसल्स ची टोक दातांच्या फटीमध्ये जाऊन जास्त चांगली स्वच्छता होते. खूप जोर लावून दात घासल्यास ब्रिसल फाकुन दातांवर आडवे घासले जातात. याने काही साध्य होत नाही. ब्रश गोलाकार किंवा वर खाली करून दात घासायला सुरुवातीला वेळ लागत असला तरी नंतर सवय झाल्यावर ३ते ५ मिनिटात ब्रश करून होतो.

             ३) टूथ ब्रश आणि टूथपेस्ट कोणते वापरावे?
              टूथब्रश कोणता वापरायचा हे तुमची हिरडी ठरवते. हिरडी चा काही त्रास असल्यास सॉफ्ट किंवा अल्ट्रा सॉफ्ट ब्रश तुम्ही वापरू शकता. नॉर्मल हिरडी साठी मिडीयम किंवा सॉफ्ट ब्रश तुमच्या आवडीप्रमाणे वापरण्यास हरकत नाही. ब्रश च्या खूप डिझाईन्स आपल्याला बघायला मिळतात यातला कोणता वापरायचा असं वाटत असेल तर एक दोन डिझाईन चे ब्रश वापरून बघा  दात स्वच्छ झाल्यासारखे वाटत असतील ती डिझाईन नेहमीसाठी वापरू शकता.एक अजून खूप महत्वाची गोष्ट म्हणजे ब्रश करायला टूथपेस्ट आणि ब्रश चाच वापर करा. बोटाने किंवा टूथ पावडर ने ब्रश केल्यास त्याचा काही फायदा नाही. टूथ पावडर चे कण मोठे असतात, दातांवर पावडर घासताना हे कण दातांच्या बाहेरच्या आवरणाला इजा करतात. याने दात पिवळसर दिसतात व दात सेन्सिटिव्ह होऊ शकतात. टूथपेस्ट देखील कण रहित असावी. triclosan, कॅल्शिअम आणि फ्लुराईड असलेली टूथपेस्ट वापरल्यास उत्तम. थंड गोष्टींची ठणक लागत असल्यास सेन्सिटिव्हीटी साठी असलेली टूथपेस्ट वापरू शकतात.

             ४) टूथब्रश आणि टूथपेस्ट कधी बदलावे?
              टूथपेस्ट बदलण्याची सहसा गरज पडत नाही.  टूथब्रश मात्र वेळोवेळी बदलावा. वर सांगितलेल्या पद्धतीने हळूवार दात घासले की तीन चार महिन्यात आपल्यालाच लक्षात येतं की या ब्रश ने दात पूर्वीसारखे स्वच्छ होत नाहीत. म्हणजे ब्रश बदलायची वेळ झाली आहे. असं समजत नसल्यास दर तीन महिन्यांनी ब्रश बदलून टाकावा.

         ५) ब्रश करताना दातातून रक्त येतं असं का?
         हिरडीचा कोणता त्रास असल्यास किंवा हिरडीत अन्नकण अडकून राहिल्यास ब्रश करताना त्या जागेतून थोडं रक्त येतं.यात घाबरून जायची काहीच गरज नाही. आणि ब्रश करणं बंद करायचीही काहीही गरज नाही. नेहमीप्रमाणे हळूवार ब्रश करावा. रक्त येणाऱ्या जागेला ही ब्रश ने स्वच्छ करावे. रक्त येणं आपोआप कमी होईल. तसे न झाल्यास मात्र डेंटिस्ट ला दाखवणं अनिवार्य आहे.

     टूथब्रश, टूथपेस्ट आणि याच्याशी संबंधित असलेल्या तुमच्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला यातून मिळाली असतील अशी आशा करते.
       हा लेख तुम्हाला कसा वाटला ते मला जरूर कळवा अजून काही दातांशी संबंधित प्रश्न असल्यास किंवा माझ्या लेखनात सुधारणा करावीशी वाटत असेल तर तसा कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा.

डॉ. स्मितल नितीन पवार

उज्ज्वल दातांचा दवाखानाना

नाशिक

8421755997



९ टिप्पण्या:

  1. Very nice information, conveyed in very easy & understanding language.

    उत्तर द्याहटवा

Please do not enter irrelevant comment.