सोमवार, ८ जून, २०२०

हिरडीतून रक्त येतंय????


             हिरडीतून रक्त येते मग ही टूथपेस्ट वापरा, हिरडी दुखते मग हे मंजन वापरा , हिरडी नाजूक झालीये मग हे माऊथ वॉश वापरा ब्ला ब्ला ब्ला...... अशा खूप साऱ्या जाहिराती आपल्याला टीव्हीवर रोज दिसतात. आपण आपण हे प्रॉडक्ट वापरून पण बघतो. थोडे दिवस त्याचा इफेक्ट दिसतो आणि मग जो होता तो त्रास परत चालू. आपल्या हिरडीतून रक्त का येतंय याचं कारण जाणून न घेता हे प्रॉडक्ट वापरणे म्हणजे असं झालं की भिंतीचे पोपडे निघतात भिंत ओली आहे म्हणून आणि आपण त्याच्यावर रंगाचा लेप लावत चाललोय.
                हिरडीतून रक्त येण्याची खूप कारण आहेत त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे दात न घासणे किंवा चुकीच्या पदधतीने दात घासणे. या कारणामुळे हिरडीतून रक्त येतं पण खालच्या समोरील दातांच्या हिरडीतून रक्त यायचं प्रमाण खूप आहे. दात घासताना ब्रशिंग टेक्नीक चुकीची असल्यामुळे ब्रश करण्याकडे  दुर्लक्ष  होतं किंवा नीट ब्रश करता येत नाही. तिथे दातावर एक पात्तळ थर तयार होतो. काही कालावधी नंतर तो कडक होतो आणि दाताला चिकटून बसतो. असा थर टूथब्रश नी  निघत नाही. हा थर वाढत जाऊन हिरडी च्या खाली वाढायला सुरुवात  होते. या थरात बॅक्टेरिया असतात. यामुळे हिरडीला त्रास होतो आणि हिरडीतून रक्त यायला चालू होतं. याला जिंजवाइटीस म्हणतात. हा बॅक्टेरिया असलेला थर काढून टाकला नाही तर हिरडीचे दुसरे आजार होणे चालू होते. म्हणून उत्तम ब्रश करणे हा हिरडी व्यवस्थित ठेवण्याचा प्राथमिक उपाय आहे. 

  सकस आहार न घेणे हे सुद्धा हिरडीतून रक्त येण्याचे कारण असू शकते. विटामिन सी ची कमतरता असल्यास हिरडीतून रक्त येते. याला स्कर्वी म्हणतात. हिरड्या लाल होतात आणि सूजही येते. विटामिन के ची कमतरता असल्यास सुद्धा हिरडी वर हेच परिणाम दिसून येतात त्यामुळे आहारामध्ये सर्व प्रकारच्या अन्नपदार्थांचा समावेश करावा. आहारात लिंबू चिंच यांचा वापर करावा. संत्री-मोसंबी यासारखी फळे खावीत.

         काही आजारांमुळे देखील हिरडीमधून रक्त येऊ शकते जसे की हिमोफिलिया , ल्यूकेमिया. पण या आजारचं प्रमाण अत्यंत कमी आहे.
        गरोदर पणा मध्ये काही शारीरिक बदलांबरोबर हिरडी सुजणे आणि त्यातून रक्त येणे अगदी नॉर्मल आहे.
         कधी कधी चुकीच्या पद्धतीने दात घासताना ब्रश लागून हिरडी मधून रक्त यायला चालू होतं.
         या पूर्ण लेखातून तुम्हाला कळलेच असेल की हिरडीतून रक्त येणं हा काही खूप मोठा आजार नाही. रक्त बघून ब्रश करणं बंद करणं हा त्याचा इलाज तर अजिबात नाही. छान ब्रश करा. जास्त वेळ ब्रश करा. हळूवार ब्रश करा. आणि बस.... ब्रश करा...
        कसा वाटला हा लेख मला जरूर कळवा. काही सुधारणा करावीशी वाटली तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा.

डॉ. स्मितल नितीन पवार

उज्ज्वल दातांचा दवाखाना

नाशिक.

8421755997

  मला फेसबुक वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा

Ujjwal Dental Clinic Facebook

मला LinkedIn वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा

drsmital LinkedIn
                  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please do not enter irrelevant comment.