"डॉक्टरांनी रूट कॅनल ट्रीटमेंट करायला सांगितली आहे. हे RCT काय असतं ग?" मैत्रिणीनी फोनवर विचारलं.
"दात दुखतोय वाटतं?" थोडं हसत माझा रिप्लाय.
"हो ना."
"ओके.सांगते."
........आणि आमच्या गप्पा तासभर रंगल्या.डॉक्टरांकडे जाऊन आलेले आणि त्यांनी सांगितलेली ट्रीटमेंट कशी असते असे विचारणारे फोन मी डेंटिस्ट असल्यामुळे मला नेहमीच येतात. दाताची ट्रीटमेंट फक्त गोळ्या औषध यांनी होत नाही. दाताचा किडलेला भाग काढून टाकल्याशिवाय दाताची ट्रीटमेंट पूर्ण होत नाही. आज आपण जाणून घेऊया की रुट कनाल ट्रीटमेंट कधी करावी लागते.

दात हा तीन प्रकारच्या आवरणानी बनलेला असतो. सगळ्यात वरचं आवरण जे आपल्या सगळ्यांना तोंडात दातावर दिसतं ते पांढऱ्या रंगाचं. त्याला इनॅमल म्हणतात. दुसरी लेयर असते डेन्टीनची. हे आवरण इनॅमल च्या खालचं आवरण असतं. आणि सगळ्यात मधला भाग असतो त्याला म्हणतात पल्प. पल्प हा दाताच्या मुळामधून हाडा पर्यंत पोहोचलेला असतो. हा पल्प हाडापर्यंत पोहोचण्यासाठी मुळामध्ये जो अरुंद पाइप सारखा भाग तयार होतो त्याला म्हणतात रूट कॅनाल. असा बनलेला असतो दात.
कीड लागते म्हणजे नक्की काय होतं? दात हा कॅल्शियम ब्लॉग्स चा बनलेला असतो. अन्नकण दातात अडकून राहिल्यावर तिथेच कुजतात. या तयार झालेल्या जीवाणूं मुळे दातांमधल्या कॅल्शियम चे विघटन चालू होते आणि दातांमध्ये खड्डा तयार होतो. सुरुवातीला हा खड्डा अतिशय लहान असतो. खड्डा लहान असला तरी त्यात अन्नकण अडकणे वाढतच जाते. सुरुवातीचा हा लहान खड्डा दाताच्या सगळ्यात वरच्या आवरणात म्हणजेच ईनॅमल मध्ये असतो. दातामध्ये असलेल्या अशा खड्ड्याचा आणि त्यात अडकलेल्या अन्नकणांचा आपल्याला थोडाही त्रास होत नाही.
आता आपण लक्ष देत नाही म्हटल्यावर कीड म्हणजेच जीवाणु अजूनच जोरात कामाला लागतात. दातां मधल्या कॅल्शियमचे अजूनच विघटन चालू होते. दाता मधला खड्डा मोठा होतो आणि दाताच्या दुसऱ्या लेयर मध्ये म्हणजेच डेन्टीन मध्ये पोचतो. आत्तापर्यंत दातामध्ये थोडं जास्त प्रमाणात अडकत असतं. थंड आणि गोड खाल्ल्यावर ठणका बसतो किंवा सेन्सिटिव्हिटी येते. पण ही सेन्सिटिव्हिटी किंवा ठणका थोड्याच वेळात थांबतो. या स्टेजला दात आपल्याला वारंवार सिग्नल देत असतो आणि त्याच्याकडे लक्ष द्यायला सांगत असतो.
वेळेचा अभाव आणि दुसऱ्या बाजूला व्यवस्थित चालू असलेले जेवण त्यामुळे आपलं दाताकडे जरी दुर्लक्ष झालं तरी बॅक्टेरिया किंवा जीवाणूंचं मात्र दाताकडे थोडंही दुर्लक्ष होत नाही. आता कीड पोचते सगळ्यात मधल्या भागात. पल्प मध्ये. पल्प म्हणजे दाताचा गाभा. दाताच्या गाभ्यामध्ये असतात त्याच्या रक्तवाहिन्या, नसा, मज्जातंतू. दाताच्या गाभ्यापर्यंत जिवाणू पोहोचले की मग मात्र दात आपल्याला शांत बसून देत नाही. पेन किलर तरी किती वेळ घेणार?? आणि मग वेळ काढून आपण दातांच्या दवाखान्यात पोहोचतो.
दातांची कीड दिसते का? नाही. ताप आल्यावर जसा तापाचा जीवाणू दिसत नाही तसाच दातामध्ये खड्डा तयार करणारा जिवाणू आपल्या डोळ्यांना दिसत नाही. भिंतीला वाळवी लागल्यावर भिंत जशी पोखरते तसेच हे जिवाणू देखील दाताला पोखरतात आणि त्यांनी दाताच्या कोणत्या आवरणा पर्यंत पोखरले आहे हे बघून दाताची ट्रीटमेंट सांगितली जाते.
दातांच्या दवाखान्यात तपासणी करून एक्स-रे काढून दातांची कीड कुठपर्यंत पोहोचली आहे हे हे बघितले जाते. कीड दातांच्या सगळ्यात वरच्या म्हणजेच इनॅमल मध्येच असेल तर दाताचा खराब झालेला किंवा काळा पडलेला भाग काढून टाकतात आणि तयार झालेला खड्डा भरून टाकतात. दातांमधील असलेले खड्डे किंवा कॅव्हिटी भरण्यासाठी खूप प्रकारचे डेंटल मटेरियल उपलब्ध आहेत.
दाताच्या खालच्या लेअर म्हणजेच डेन्टीन पर्यंत कीड पसरली असेल तरीही थोडे प्रयत्न करून दाताचा खराब झालेला सगळा भाग काढून टाकतात आणि तयार झालेला खड्डा डेंटल मटेरियल चा वापर करून भरून टाकला जातो. थोडे प्रयत्न करून हे यासाठी म्हटलं कारण दाताची दुसरी लेअर म्हणजे डेंटिन ही थंड पाण्याला सेन्सिटिव्ह असते त्यामुळे दाताचा खराब झालेला भाग काढून टाकताना थोडा त्रास होऊ शकतो.
दाताच्या गाभ्यापर्यंत पोहोचलेली किड मात्र आपल्याला अशीच काढून टाकता येत नाही. रक्तवाहिन्या, नसा आणि मज्जातंतू यांचं जाळं पल्प मध्ये असल्यामुळे आपल्याला दाताची रूट कॅनल ट्रीटमेंट करावी लागते. रूट कॅनल ट्रीटमेंट मध्ये खराब झालेला दाताचा भाग आणि जिवाणू असलेला दाताचा गाभा म्हणजेच पल्प काढून टाकला जातो. दातांमध्ये आणि तोंडामध्ये वापरल्या जाणाऱ्या औषधांनी दातांचा इन्फेक्शन असलेला भाग स्वच्छ केला जातो. आणि पोकळ झालेला दाताचा भाग खास दातांसाठी आणि रूट कॅनल ट्रीटमेंट साठी बनवल्या गेलेल्या मटेरियल चा वापर करून भरून टाकला जातो. याला दात रिस्टोअर करणे असं म्हणतात. रूट कॅनल ट्रीटमेंट केल्यानंतर दात जिवाणू विरहित होतो. दाताचं दुखणं पूर्णपणे बंद होतं. आणि त्या दाताचा वापर खाण्यासाठी सुद्धा केला जाऊ शकतो.
याचाच अर्थ की जेव्हा दात दुखल्यामुळे आपण डॉक्टरांकडे जातो तेव्हा पहिलेच खूप उशीर झालेला असतो आणि ट्रीटमेंट साठी अजून विचार करत बसलो तर दात गमवायची वेळही येऊ शकते. रूट कॅनल ट्रीटमेंट ही दातांना लागलेली कीड काढून दात पूर्ववत करायची शेवटची संधी असते. यानंतर इन्फेक्शन वाढलं तर दात काढून टाकावा लागतो.
वयाच्या पहिलेच म्हातारं दिसायला आणि कवळी लावायला कोणाला आवडेल नाही का? म्हणूनच अन्नकण अडकायला चालू झालेत असं वाटलं की एकदा डेंटिस्ट ला दाखऊन ट्रीटमेंट करून घ्या. दाताची काळजी घ्या. मस्त खा. स्वस्थ राहा.....
हा लेख कसा वाटला जरूर कळवा आणि दाताशी संबंधित अजून कोणती माहिती पाहिजे असल्यास किंवा काही सजेशन असल्यास कमेंट करा. धन्यवाद.
डॉ. स्मितल नितीन पवार
उज्ज्वल दातांचा दवाखाना
नाशिक.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please do not enter irrelevant comment.