बुधवार, २४ जून, २०२०

दात खूप दुखतोय. वाचवू की काढून टाकू????

संध्याकाळी सहा वाजताची अपॉइंटमेंट आत आली. पन्नाशीचे गृहस्थ आणि त्यांच्यापेक्षा वयाने थोडी कमी वाटणारी त्यांची सौ. दोघेही येऊन खुर्चीवर बसले.
               "काय सेवा करू तुमची?" मी दोघांकडे बघून प्रश्न विचारला.
               "हिचा दात किडलाय. दुखतोय खूप." त्या गृहस्थांनी सांगितले.
               "चला, चेकअप करूया." असं बोलून मी त्यांच्या तोंडात माऊथ मिरर आणि प्रोब घालून त्यांचा किडलेला दात चेक केला.
दात तर खूप किडलेला होता. त्या दाताचा एक्स रे काढला. तो दात काढूनच टाकावा एवढा खराब झालेला नव्हता.
              "दात खूप किडलाय तुमचा.रूट कॅनल ट्रीटमेंट करावे लागेल." मी त्यांना त्यांच्या दाताची ट्रीटमेंट सांगितली.
               थोडा विचार करून पेशंट ने विचारलं,"कीड काढून नुसतं सिमेंट नाही भरता येणार का?"
               हा प्रश्न तर माझ्या खूप सवयीचा आहे. रूट कॅनल ट्रीटमेंट म्हणजे खूप त्रास होणार, खूप इंजेक्शन घ्यावे लागणार, खूप वेळा याव लागणार, आणि खूप पैसे द्यावे लागणार असं बहुतांशी लोकांना वाटतं आणि काही अंशी ते खरंही आहे. या प्रश्नावर माझं उत्तर ठरलेलं आहे.
               "दात वाचवायचा असेल तर रूट कॅनल ट्रीटमेंट ही एकमेव ट्रीटमेंट आहे. औषध घेऊन किंवा नुसतं सिमेंट भरून तुमचा दात वाचण्यासारखा नाही. रूट कॅनल ट्रीटमेंट करायची नसेल आणि या दाताचे दुखणे कायमचं घालवायचं असेल तर दात काढून टाकावा लागेल."
               आता परत पेशंट विचार करायला लागला,"दात वाचवू की काढून टाकू?"
या आशयाचा प्रसंग बऱ्याचदा माझ्या दवाखान्यात घडतो.
              या प्रसंगाला कारणीभूत किंवा दात काढू की वाचवू असा विचार करायला लावणारी खूप कारणं आहेत.
१) रूट कॅनाल ट्रीटमेंट चे चार्जेस हे दात काढण्यासाठी लागणाऱ्या चार्जेस पेक्षा कितीतरी पटींनी जास्त आहेत.


२) रूट कॅनल ट्रीटमेंट साठी एकापेक्षा जास्त वेळा यावं लागतं. तेच दात काढण्याचं काम लगेच होतं.


३) आपल्या तोंडात बत्तीस दात आहेत त्यातला एक दात काढून टाकला तर काही फरक पडत नाही असं बऱ्याच लोकांना वाटतं.


४) "एकदा किडलेला दात काढून टाकला की कायमची कटकट निघून जाईल. परत नकोच तो दुखणारा दात." असा विचार करणारा वर्ग ही खूप मोठा आहे.


आता यावर मुखरोग तज्ञ म्हणून मला काय वाटतं हे मी सांगणार आहे. सगळ्यात पहिले तर दात संख्येने जरी बत्तीस असतील तरीही 'एखादा खराब झाला तर काही होत नाही' असा विचार न करता त्यांच्याकडे थोडं लक्ष दिलं पाहिजे. हाताची आणि पायाची मिळून वीस बोटं आहेत म्हणून एखादं बोट दुखलं म्हणून आपण ते कापून टाकत नाही. दाताच्या बाबतीतही तसाच विचार करणे गरजेचे आहे. दात काढून टाकावा लागेल एवढा खराब तो एका दिवसात होत नाही. थोडासा खराब झाल्यानंतर दातांच्या दवाखान्यात गेल्यास दाताची ट्रीटमेंट कमी त्रासात पूर्ण होते.
आणि दात जर एवढा खराब झाला असेल की डॉक्टरांनी त्याच रूट कॅनल ट्रीटमेंट करायला सांगितल तर ते करून घ्यावं. दात वेळेच्या आधी काढून टाकायचे बरेचसे दुष्परिणाम आहेत. हे परिणाम लगेच दिसून येत नाही. एक- दोन वर्षानंतर यातील काही बदल तोंडात दिसणे चालू होते. 


१) एखादा दात काढून टाकला तर त्याच्या विरुद्ध जबड्यात असणारा दात त्याची जागा बदलायला चालू करतो. वरचा दात असल्यास खाली येतो आणि खालचा दात असल्यास वर सरकतो.


२) जो दात काढून टाकतो त्याच्या आजूबाजूचे दात रिकाम्या जागेत सरकणे चालू होते.


३) दात काढल्यानंतर तिथे तयार झालेल्या पोकळी मुळे गाल मध्ये जातात आणि चेहऱ्यावरून वय वाढलेलं दिसते.


४) दात काढून टाकलेल्या बाजूने चावण्याची क्रिया कमी वेळेला होते. यामुळे तिथल्या हिरड्या देखील खराब होऊ शकतात.


५) दात काढून टाकल्याने इतर दातांचं संतुलन बिघडते. त्याने जबडा उघडताना वा बंद करताना जबड्याचा कानाच्या बाजूने आवाज येणे अशी समस्या उद्भवते.


६)एखादा दात काढून टाकल्यावर त्या रिकामी जागेत आजू बाजू चे दात सरकण्याचा प्रयत्न करतात. यामुळे दातांमध्ये फट तयार होऊ शकते. या फटींमध्ये अन्नकण अडकणे किंवा पुढचे दात असल्यास स्माइल खराब दिसणे असे प्रॉब्लेम्स येऊ शकतात.


दात काढल्यावर त्याचे एवढे गंभीर परिणाम होऊ शकतात हे बऱ्याच जणांना माहीत नसते. त्यामुळे दात काढू की रूट कॅनाल ट्रीटमेंट करू असा विचार न करता जी ट्रीटमेंट करून दात वाचवता येऊ शकतो ती ट्रीटमेंट करून वाचवा. दात असतील तर आपण चांगलं खाऊ शकतो आणि आपले आरोग्य चांगले ठेऊ शकतो. स्वस्थ राहा. मस्त राहा..

कसा वाटला हा लेख जरूर कळवा. दातांशी संबंधित अजून कोणत्या विषयावर माहिती वाचायची असल्यास कमेंट करून नक्की लिहा.

स्मितल नितीन पवार

उज्ज्वल दातांचा दवाखाना

नाशिक.

  



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please do not enter irrelevant comment.