मंगळवार, २८ जुलै, २०२०

दातांमधली फट बंद कशी करता येईल??

        

              "डाक्टर साब, ये सामने वाले दातों मे बहुत गॅप है और बहुत खराब हो गये है। घर में शादी है। तो इसका कुछ कर सकते है क्या?" पेशंट आसाम चा होता.

        चेक अप करताना लक्षात आलं की त्याच्या हिरड्या अगदी उत्तम अवस्थेत होत्या पण दातांवर लाल रंगाचे डाग होते आणि दातांमध्येत गॅप पण दिसत होता. 

        त्याला सगळ्यात पाहिले दातांना तार लावायचा म्हणजेच ऑर्थोडोंटिक ट्रीटमेंट ( orthodontic treatment) करण्याचा सल्ला दिला. दातांना तार बसल्यावर ती ट्रीटमेंट वर्षभर तरी चालते. त्या पेशंट ला वर्षभर थांबणं शक्य नव्हतं. 

          दुसरा पर्याय दात साफ करून कंपोझिट फिलिंग (composite filling) करण्याचा होता. या पर्यायात ट्रीटमेंट लगेच होत होती. म्हणून पेशंट ट्रीटमेंट करण्यासाठी लगेच तयार झाला.

         हीच केस मी इथे तुम्हाला दखावणार आहे. या फोटोत उपचारापूर्वीचा आणि नंतर चा फरक स्पष्ट दिसतो आहे.

      

         पेशंट च्या दातांवर असलेले लाल रंगाचे डाग आणि दातांमधील फटी दिसायला चांगल्या दिसत नाहीत.

   दात साफ केल्यानंतर बराच फरक दिसला. इथे फक्त दात स्वच्छ म्हणजेच स्केलींग केली आहे. दातांची शेड बदलली नाही. दातांची शेड बदलण्याच्या ट्रीटमेंट ला ब्लिचिंग म्हणतात.(स्केलींग आणि ब्लिचिंग मधला फरक वाचायचा असल्यास क्लिक करा )


           दातांची ट्रीटमेंट करताना थुंकी आणि जीभ मध्ये मध्ये येऊ नये म्हणून रब्बर डॅम लावला आहे.


             दातांवर फिलिंग जास्त घट्ट बसावी म्हणून एक सोल्युशन लावलं जातं. या प्रोसेस ला ईचींग म्हणतात.


             कम्पोझिट मटेरियल दातांवर लाऊन त्याला साधारण दातांचा शेप दिला जातो.


             अधिक असलेलं मटेरियल काढून टाकल्यावर दातांची फिनिशिंग आणि पाॅलीशिंग केली. या सर्व प्रीसिजर चा रिझल्ट असा झाला.
           

            ही ट्रीटमेंट करण्यासाठी काही साधक बाधक नियम आहेत ते असे
१) या ट्रीटमेंट साठी हिरड्यांची अवस्था उत्तम हवी.
२) या ट्रीटमेंट मध्ये फक्त दतांमधील फट भरली जाते.दात मागे घेतले जाऊ शकत नाही.
३) खूपच वेड्यावाकड्या दातांची ट्रीटमेंट शकत नाही.
४) दातांचा आकार थोडाफार मोठा होतो.
५) समोरील दातांनी कडक वस्तू खाताना काळजी घ्यावी.

             कसा वाटला हा लेख जरूर कळवा आणि दतांविषयी अजून काही माहिती हवी असल्यास कमेंट बॉक्स मध्ये लिहून पाठवा.

स्मितल नितीन पवार

उज्ज्वल दातांचा दवाखाना

नाशिक

मला फेसबुक वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा

Ujjwal Dental Clinic Facebook page

मला LinkedIn वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा.

drsmital LinkedIn

माझे दुसरे लेख वाचण्यासाठी क्लिक करा


रूट कॅनल ट्रीटमेंट का करतात?rootcanaltreatment

दात कसे घासावेत?brushingtechnique



     

बुधवार, २२ जुलै, २०२०

दातांची कवळी का, कधी आणि कशी बनऊ?


         नमस्कार... कसे आहात तुम्ही? हा लेख खास मी अशा लोकांसाठी लिहिणार आहे ज्यांच्या तोंडात एकही दात नाही. जे हिरडीचा वापर करून जेवतात त्यांना नाही पण ज्यांना पहीलेसारखं दाताने अन्न बारीक करून खायचं आहे त्यांच्यासाठी हा लेख खूप सारी माहिती देऊन जाणार आहे.
           बऱ्याच पेशंट ना दात काढून टाकायची खूप घाई असते. दात दुखला की टाका काढून... आणि तोंडातले बरेच दात काढून टाकले की जेवायची पंचाईत होते. मग उरलेले सगळे दात काढून कवळी लावायची पण घाई.. काहींचे वयोमानानुसार दात पडतात आणि जेवण कमी जात असल्याने तब्येत पण ढासळते. काहीच्या हीरडीचा त्रास असल्याने दात लवकर पडतात. अश्या काही न काही कारणाने तोंडात एकही दात रहात नाही. मग चपाती भाकर खाणे खूप मुश्किल काम होते आणि कवळी बनऊया असा विचार मनात डोकवायला लागतो. काही प्रश्न जे कवळी बसवताना पेशंट नेहमी विचारतात त्यातल्या काहींची उत्तरे देण्याचा प्रयत्न मी इथे केला आहे.
            

             हिरडीने खाता येत असेल तरी कवळी बनवावी का?
            हो. हिरडीने खाताना आपण त्यांचा दातासारखा वापर करतो. त्यामुळे त्या एकमेकांवर घासल्या जाऊन कमी होऊ लागतात. मग हिरडीने देखील खाता येत नाही. त्यावेळेस मात्र जबड्याचं हाड कमी झाल्याने कवळी बसवायला त्रास होतो. म्हणून सुरुवातीला जरी हिरडीने खाता येत असेल तरी सगळे दात पडल्यावर किंवा काढून टाकल्यावर लगेचच कवळी बसवावी.

           कवळी बसावल्यावर मला लगेच खाता येईल का?
           कवळी हातात मिळाल्यावर लगेच दुसऱ्या मिनिटाला तुम्हाला सगळं काही खाता येईल अशी खोटी आशा मी इथे तुम्हाला देऊ इच्छित नाही. कवळी मिळाल्यावर बऱ्याच दिवसानंतर तोंडात सगळेच्या सगळे दात एकदम येतात. त्यामुळे कवळीला तोंडात अॅडजस्ट व्हायला थोडे दिवस द्यावे लागतात. कवळीची सवय झाल्यानंतर मात्र तुम्ही कवळी वापरून व्यवस्थित जेऊ शकतात.

              आज हिरडीचं माप देऊन गेलो की लगेच उद्या कवळी मिळेल का?
               कवळी बनवताना पाच प्रकारचे वेगवेगळे माप घ्यावे लागतात. लवकरात लवकर कवळी देण्याचा प्रयत्न प्रत्येक डॉक्टर करतो. पण हे शक्य होईल च असं नाही. म्हणून पेशंट ने थोडा धीर ठेवणे गरजेचे आहे.

               कवळी तोंडातून कधीच नाही काढली तरी चालते का?
              कवळी ही रोज रात्री काढून स्वच्छ करून पाण्यात ठेवावी. पूर्ण दिवस हिरडी कवळी च्या खाली दाबलेली राहते. तिला आराम मिळणे पण गरजेचे आहे. कवळी काढून हिरडीला बोटाने मालिश केल्यास हिरडी पण चांगली राहील.

             कवळी काढून बाहेरच ठेवली तर चालेल का?
             कवळी काढून पाण्यातच ठेवावी. कवळी बाहेर ठेवल्यास त्यामध्ये थोडेफार बदल होण्याची शक्यता असते. तसे होऊ नये म्हणून कवळी कधीही बाहेर ठेऊ नये. नेहमी पाण्यात ठेवावी.


             कवळी काढ - घाल करायचीच असते का? फिक्स कवळी नाही बनऊन मिळणार का?
             हो. कवळी फिक्स पण करता येते. पण ती फिक्स करण्यासाठी जबड्या मध्ये इम्प्लान्ट टाकला जातो. अश्या कवळी ला इम्प्लान्ट सपोर्टेड ओवरडेंचर असं म्हणतात.


पेशंट च्या हिरडी च हाड खूप कमी असल्यास अश्या पद्धतीचा वापर केला जातो. या प्रकार कवळीचा खूप कमी त्रास पेशंट ला होतो.

           हे थोडेफार प्रश्न जे पेशंट कडून नेहेमी विचारले जातात. याशिवाय काही प्रश्न विचारायचे असल्यास कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा.
           मस्त खा आणि स्वस्थ रहा.

डॉ. स्मितल नितीन पवार

उज्ज्वल दातांचा दवाखाना

नाशिक

    मला फेसबुक वर फॉलो करा Facebook 

https://www.facebook.com/Dr-Smital-Nitin-Pawar-Ujjwal-Dental-Clinic-114093043684175/

मला Linkedin वर फॉलो करा. linkedin

 https://www.linkedin.com/in/dr-smital-pawar-3344b61b1


बुधवार, १५ जुलै, २०२०

पांढरे शुभ्र दात पाहिजेत???


         "मला माझे दात खूप पिवळे वाटतात. साफ करायचे आहेत."
         ही बऱ्याच पेशंट ची 'चीफ कंप्लेंट' म्हणजेच डेंटल चेअर वर बसल्यावर समस्या सांगतानाचं पाहिलं वाक्य असतं. तसं बघायला गेलं तर मला पेशंट ने क्लिनिक मध्ये येऊन फक्त त्याला होणारा त्रास सांगणं अपेक्षित आहे. 'दात पिवळे वाटतात' हा होणारा त्रास आणि त्या बरोबर च 'दात साफ करायचे आहेत' ही ट्रीटमेंट पेशंट स्वतः च सांगून पार होतात. मग माझी प्रश्नावली चालू होते.
          "तुम्हाला कोणी सांगितलय का की तुमचे दात पिवळे आहेत?" मी.
           "नाही. मलाच जाणवतात. आरशात पाहिल्यावर असं वाटतं."
           "याच्या पहिले कधी दात साफ केलेत का?"
           " नाही. पहिल्यांदाच डेंटल क्लिनिक मध्ये पाऊल ठेवल आहे. मी असं पण कधी डॉक्टर कडे जात नाही. कधी आजारीच नाही पडत ना! साधी कोणती गोळी चालू नाही मला. हे दात च थोडे पिवळे वाटतात. विचार केला साफ करून घेऊ."
            "मग तुम्हाला कोणी सांगितलय का की दात साफ केले की पांढरे होतात?"
             " नाही. असं कोणी सांगितलं नाही पण दात साफ केले तर पांढरे तर दिसतीलच ना?"
             "चला तुमचे दात चेक करू पहिले. मग मी तुम्हाला सांगते तुमचे दात साफ केल्यावर पांढरे दिसतील की नाही ते." या वाक्यानंतर माझं काम चालू होतं. नाही नाही.... चेक अप करून ट्रीटमेंट करायचं नाही तर दात साफ करणे आणि दात पांढरे करणे यात काय फरक आहे ते पेशंट ला समजवायचं काम.
            दातांवर प्लाक, कॅलकुलस जमला म्हणजेच साध्या भाषेत सांगायचं तर घाण जमली आणि ती कडक झाली की दात साफ करावे लागतात.


               याला स्केलिंग किंवा दात साफ करणे असे म्हणतात. या ट्रीटमेंट मध्ये तुमच्या दाताची ओरिजनल शेड परत येते कारण दातांवर कडक झालेल्या घाणीचा रंग हा शक्यतो पिवळा असतो. कधी कधी तो लाल किंवा काळा पण असू शकतो.



          स्केलींग ने चहा काॅफी, तंबाखू, काही प्रकारचे मेडिसिन यांनी दातांवर पडलेले डाग सुद्धा निघून जातात आणि दात स्वच्छ दिसतात.
         पण दातांवर पडलेले काही डाग असे असतात की जे स्केलिंग करून किंवा दात साफ करून निघत नाही.


. अशावेळी दातांवरचे डाग घालवण्यासाठी डेंटल ब्लिचिंग करावी लागते. याच ट्रीटमेंटचा म्हणजेच डेंटल ब्लिचिंग चा उपयोग करून आपण आपले दात पांढरे शुभ्र करू शकतो.
  
       डेंटल ब्लिचिंग म्हणजे काय?
       डेंटल ब्लिचिंग ही एक अशी ट्रीटमेंट आहे ज्यात दात सध्या आहेत त्या दाताच्या शेडपेक्षा चार शेड अधिक पांढरे दिसू शकतात.


 दातांवरचे 'इंटरनल स्टेन्स' म्हणजेच दातांवरील जे डाग स्केलिंग करून जात नाही असे डाग डेंटल ब्लिचिंग करून काढून टाकता येऊ शकतात. यामध्ये दाताची वरवर स्वच्छता न करता त्याची शेड आत मधून बदलली जाते.
        
            डेंटल ब्लिचिंग चा इफेक्ट नेहमीसाठी म्हणजेच परमनंट आहे का?
          नाही. डेंटल ब्लिचिंग चा इफेक्ट हा काही कालावधीसाठी म्हणजे दाहा ते बारा महिन्यासाठी असू शकतो. यानंतर दातांची ओरिजनल शेड परत येणे चालू होते. परत दात पांढरे करायचे असल्यास पुन्हा डेंटल ब्लिचिंग करावे लागते.
         
           डेंटल ब्लिचिंग केल्यावर काय खबरदारी घ्यावी लागते?
           आपले भारतीय अन्नपदार्थांमध्ये हळद मसाले यांचा भरपूर वापर केला जातो. याचा दातांवर परिणाम होतो. स्वयंपाकात अश्या गोष्टींचा वापर जेवढा कमी करता येईल तेवढा करावा. डेंटल ब्लिचिंग केल्यानंतर काही लोकांना सेन्सिटिव्हिटी जाणवते. त्यांनी सेन्सिटिव्ह टूथपेस्ट चा वापर करावा. खूप जास्त थंड व खूप जास्त गरम अन्नपदार्थ टाळावेत.

         डेंटल ब्लिचिंग कोणी करावे?
         सुंदर हास्य हा आपल्या व्यक्तीमत्त्वाचा अविभाज्य भाग आहे. स्माईल चांगली असल्यास दुसऱ्यांवर चांगली छाप पाडता येते. ज्यांना दात पिवळे असल्यामुळे दिलखुलास हसायची लाज वाटते, ज्यांचा कामानिमित्त किंवा इतर काही कारणांनी बऱ्याच लोकांशी संपर्क येतो ते डेंटल ब्लिचिंग करून घेऊ शकतात. बरेच नट- नट्या डेंटल ब्लिचिंग करतात. लग्नासारखी मोठी गोष्ट असल्यास नवरा नवरी डेंटल ब्लिचिंग करण्यास महत्व देतात. आजकालच्या स्पर्धात्मक युगात कोणीही ही ट्रीटमेंट करून घेऊ शकतात.

                या लेखातून मी दात साफ करणे म्हणजेच दात पांढरे करणे असा बऱ्याच लोकांचा असलेल्या गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. खूपदा दात साफ केल्यानंतर स्वच्छ झाल्यामुळे ते पांढरे दिसतात पण नेहमीच असं नसतं. यामुळे दात साफ करायला आलेल्या पेशंटचा भ्रमनिरास होऊ शकतो. असं होऊ नये म्हणून मी हा थोडासा प्रयत्न केला आहे.

               हा लेख कसा वाटला जरूर कळवा. दातांबद्दल अजून काही माहिती हवी असल्यास कमेंट बॉक्समध्ये लिहून मला पाठवा. धन्यवाद.


डॉ. स्मितल नितीन पवार

उज्वल दातांचा दवाखाना

नाशिक

8421755997

मला फेसबुक वर फॉलो करा
          Facebook Ujjwal Dental Clinic   

मला Linkedin वर फॉलो करा

LinkedIn smitalpawar