माझ्या दवाखान्यात एक अडीच वर्षाचा मुलगा गालाला सूज घेऊन आलेला. त्याचे आई-बाबा दोघेजण त्याच्याबरोबर आले होते. त्या छोट्या पेशंट बरोबर त्याची आई सुद्धा रडायला आली होती. पेशंटला डेंटल चेअरवर चेकअप करायला बसवलं पण पेशंट एवढा छोटा होता की डेंटल चेअर बसल्या बसल्या त्याने भोकाड पसरलं. मग त्याच्या आईला त्याला मांडीवर घेऊन डेंटल चेअर वर बसावं लागलं कारण गालाला आलेली एवढी सूज कशामुळे आली आहे हे बघणं गरजेचं होतं. चेक अप करताना लक्षात आलं की याच्या तोंडात दाता पेक्षा जास्त किड च दिसते. आणि दातांमध्ये लागलेल्या कीड मुळे पू तयार झाला होता.
त्याची हिरडी अक्षरशः फाडून हाडांमध्ये झालेला पू काढावा लागला. त्या छोट्या मुलाची अवस्था बघून मलासुद्धा खूप वाईट वाटलं.

लहान मुलांचे दात लवकर का किडतात? लहान मुलांचे दात कसे साफ करावेत, कधीपासून ब्रश करायला चालू करायला पाहिजे याबाबत बऱ्याच जणांना व्यवस्थित माहिती नाही. त्यामुळे सगळे दात आल्यावर देखील लहान मुलांना ब्रश करायला सांगितला जात नाही. इथूनच दात किडायला चालू होतात. बाळ सहा महिन्यांचे झाल्यानंतर बाळाला वरचं दूध , बाहेरचे अन्नपदार्थ खायला चालू करण्यास सांगितले जाते. यामध्ये गोडाचे प्रमाण खूप असते. अशावेळी हिरडी ची आणि दातांची स्वच्छता ठेवली नाही की दात येतानाच कीड लागायला चालू होते. बहुतेक लहान मुलांना झोपताना दूध देऊन झोपवले जाते. या दुधामध्ये साखर टाकलेली असते. लहान मुल दूध पिता पिता झोपून जाते. त्यामुळे दुधात असलेली साखर तोंडात दातांवर तशीच राहते. अशा मुलांना दातात कीड लागायचं प्रमाण खूप आहे. चॉकलेट , वेफर्स हेसुद्धा मुलांच्या खूप आवडीचे पदार्थ असल्यामुळे यांच्यापासून मुलांना दूर ठेवणे खूप खूप कठीण काम आहे. असे पदार्थ खूप चिकट असल्यामुळे दातांच्या फटीमध्ये चिकटून आणि अडकून राहतात. त्यांच्यावर बॅक्टेरिया च संक्रमण होऊन कीड लागते. अशाच एक ना अनेक कारणांमुळे लहान मुलांच्या दातांना कीड लागायच प्रमाण मोठ्यांपेक्षा जास्त आहे.
लहान मुलांच्या दातांमध्ये कीड लागू नये म्हणून आपण काय करू शकतो? मुल जन्माला आल्यानंतर आपण जसं त्याच्या त्वचेची काळजी करतो, डोळ्यांची काळजी करतो तसंच हिरड्यांची सुद्धा काळजी करायची गरज असते. दिवसातून कधीही जेव्हा लक्षात येईल तेव्हा एक मऊसूत कापड आपल्या बोटाला गुंडाळून त्या बोटाने बाळाच्या हिरड्या आणि जीभ स्वच्छ करावी. यामुळे बाळांना तोंडात होणारे फंगल इन्फेक्शन टाळता येते. सहा महिन्यानंतर बाळाच्या तोंडात दुधाचे दात यायला चालू होतात. दात आल्यानंतर लहान मुलांच्या ब्रशने दात घासायला चालू करावे. दात आणि हिरड्या स्वच्छ ठेवणे हाच दाताला कीड लागू न देण्याचा सर्वोत्तम उपाय आहे. याव्यतिरिक्त रात्री च्या वेळेस मुलांना गोड खाण्यास देणे टाळावे. चिकट किंवा गोड अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर खळखळून गुळणी करण्याची सवय लावावी.

दुधाचे दात पडून जातात मग त्यांना कीड लागली तर काय होते? बऱ्याच पालकांचा मला दवाखान्यात हा प्रश्न असतो. हे तर अगदी बरोबर आहे की दुधाचे दात पडतात पण हे दात बाळ सहा महिन्यांचे असताना यायला चालू होतात आणि मुल बारा ते तेरा वर्षाचं होईपर्यंत पडतात. म्हणजे सरासरी बारा वर्षापर्यंत दुधाचे दात तोंडात असतात मग या दातांकडे लक्ष न देणं कितपत योग्य आहे?
किडलेल्या दाता मुळे मुलांवर काय परिणाम होतो याबाबतीत पालकांकडून दुर्लक्षित होणारे मुद्दे.....
१) किडलेला दात खाताना दुखतो म्हणून मुलं जेवणाचा प्रमाण कमी करून टाकतात. कडक आणि जास्त चावावे लागणारे पदार्थ खाणे टाळतात.
२) मुलांच्या अभ्यासावर आणि झोपेवर सुद्धा दुखऱ्या दाताचा परिणाम होतो. याने मुलांची चिडचिड होते.
३) किडलेल्या दातांमध्ये अन्नपदार्थ अडकून तोंडाची दुर्गंधी येते.
४) किडलेला दात तोंडात असल्यास आजूबाजूच्या चांगल्या दातांना कीड लागायचा प्रमाण जास्त आहे.
५) दुधाचा दात किडलेला असल्यास त्याच्या खालून येणारा पक्का दात सुद्धा खराब होऊ शकतो.
६) किडलेल्या दाता मध्ये असणारे बॅक्टेरिया अन्नपदार्थ खाताना किंवा पाणी पिताना पोटात जातात. यामुळे मुलांना पोट दुखी सारखे आजार होऊ शकतात. आणि अशा प्रकारच्या पोटदुखीच कारण दातांची कीड आहे हे बऱ्याच पालकांना लक्षात येत नाही.
७) दाताच्या इन्फेक्शनमुळे बऱ्याच मुलांना तापही येतो.
८) दात दुखल्यानंतर बरेचसे पालक आपल्या मुलांना दात दुखीवर औषध देतात. पण बारा-तेरा वर्षांमध्ये थोडं थोडं करून खूप औषध मुलांच्या पोटात जाते. हे मुलांसाठी चांगलं नाही.
हे मुद्दे वाचल्यानंतर वाचकांनीच ठरवावं की दुधाच्या दातांची ट्रीटमेंट करणे गरजेचे आहे की नाही.
दररोज मुलांच्या दातांसाठी दिलेली दोन मिनिटं ही नंतरचा होणारा खूप सारा त्रास आणि मनस्ताप कमी करतो. म्हणून जन्माला आल्यापासूनच आपल्या मुलांच्या दातांची आणि हिरड्यांची थोडीशी काळजी घ्या. त्यांना खाण्याचा आनंद घेऊ द्या आणि तुम्हीही घ्या.
कसा वाटला हा लेख जरूर कळवा. दातां बद्दलच्या अजून कोणत्या विषयावर तुम्हाला माहिती हवी आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा.
स्मितल नितीन पवार
उज्वल दातांचा दवाखाना
नाशिक.
Mast, mazya mothya muliche pan daat khup kidalele ata te padayala lagalet ani navin daat yayala lagalet
उत्तर द्याहटवा