शनिवार, १५ ऑगस्ट, २०२०

दात काढल्यानंतर घ्यायची काळजी...

 

      क्लिनिक मधून निघण्यासाठी आवराआवर चालू होती तेवढ्यात क्लिनिक चा फोन वाजला.
      "तुम्ही दात काढल्यानंतर ठेवलेला कापसाचा बोळा काढू का आता?" पलीकडून पेशंट विचारत होता.
       "किती वाजता काढला तुमचा दात?"
       "सकाळी दहा वाजताची अपॉइंटमेंट होती."
       "दहा वाजता दात काढलाय आता दीड वाजत आलाय. तुम्हाला तर एका तासाने कापूस काढायला सांगितला होता. अजून का नाही काढला?"
         "अहो लक्षातच नाही राहिलं म्हणून आता फोन केला."
         "लवकर काढा तो कापसाचा बोळा आणि आता तिथे दुसरा कापूस ठेवू नका"
          "ठीक आहे मॅडम."
           फोन ठेवून मी क्लिनिक मधून निघाली.
           दात काढल्यानंतर सरासरी दहा मधून दोन तरी पेशंट असं काहीतरी विचारायला फोन करतात. यामध्ये मी पेशंटला देखील दोष देत नाही कारण पहिलेच दात वाढताना वाटणारी भीती आणि त्यात दात काढल्यानंतर डॉक्टरांच्या खूप सार्‍या सूचना. बऱ्याचदा काहीना काही विसरायला होते. या लेखामध्ये दात काढल्या नंतर कोण कोणती काळजी घ्यावी याबद्दल मी लिहायचा प्रयत्न केला आहे.

१) दात काढल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दात काढलेल्या ठिकाणी रक्त गोठणे. जेणे करून रक्तस्राव थांबेल आणि जखम भरण्याची प्रक्रिया चालू होईल. त्यासाठी च डॉक्टरांनी जखमेच्या ठिकाणी ठेवलेला कापसाचा गोळा ३० ते ४५ मिनिटे दाबून धरावा.

२) बाहेरून गालाला बर्फाने शेकायला चालू करावे आणि दिवस भर शक्य तेवढ्या वेळा असे करावे.

३) रक्त गोठल्यानंतर कमीत कमी २४ तास जखमेची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे. त्यासाठी पुढील गोष्टी टाळाव्यात.
        -पान, तंबाखू, गुटखा वगैरे खाणे टाळावे.
        -धूम्रपान करणे टाळावे.
        -मद्यपान करणे टाळावे.
        -जखमेच्या ठिकाणी जिभ किंवा बोट लावू नये.
        -जखमेच्या ठिकाणी घरगुती वापराचा कापूस ठेवू नये.
        -भूल उतरेपर्यंत कडक काहीही खाऊ नये.
        -नळी किंवा स्ट्रॉ ने दूध, ज्यूस किंवा नारळ पाणी पिऊ                                         नये.     
        -खूप जोरात चूळ भरू नये अथवा गुळणी करू नये.
         -जखमेच्या ठिकाणी खूप जोरात ब्रश करू नये.
         -दात काढल्यानंतर पुढे दिवसभर थुंकू नये. तोंडात थुंकी किंवा रक्त आल्यास गिळून टाकावे.
           वरील गोष्टी केल्यास त्या गोठलेल्या रक्ताला सरकवू शकतात आणि त्यामुळे जखम भरण्याची प्रक्रिया लांबू शकते.

४) दात काढल्यानंतर दुसऱ्या दिवशी आराम करावा. ज्यामुळे आपला रक्तदाब कमी राहील, जखमेतून रक्तस्राव कमी होईल, जखम लवकर भरून येण्यास मदत होईल आणि जखम कमीकमी दुखेल.

५) दात काढल्यानंतर थोडे दुखू शकते आणि थोडी सूज वाटू शकते, ती एक स्वाभाविक प्रक्रिया आहे. त्यामुळे त्याची काळजी करण्याची आवश्यकता नाही. मात्र सूज व दुखणे कमी ठेवण्यासाठी दर २०-२० मिनिटांच्या अंतराने बर्फाने शेक द्यावा. ४८ तासांपर्यंत सूज व दुखणे कमी होते.

६) दुखणे कमी असावे आणि जखम लवकरात लवकर भरून निघावी त्यासाठी डॉक्टरांनी दिलेली औषधे वेळोवेळी व न चुकता घ्यावीत. बरं वाटत असेल तरी डॉक्टरांनी दिलेल्या औषधांचा कोर्स पूर्ण करावा.

दात काढल्यानंतरचा आहार आणि घ्यावयाची काळजी...
    -भरपूर द्रव पदार्थांचे सेवन करावे.(दूध, ज्यूस)

    - जखमेच्या ठिकाणाहून आईस क्रीम सारखे थंड पदार्थ खावेत.

    -दात काढल्यानंतर त्या दिवशी विरुद्ध बाजूने फक्त मऊ व पौष्टिक आहाराचे सेवन करावे. धूम्रपान व मद्यपान, तंबाखू ,गुटखा वगैरे खाऊ नये. त्यामुळे जखम भरण्यास खूप उशीर लागतो.

       -खूप गरम, तिखट तसेच मसालेदार पदार्थांचे सेवन टाळावे.

       -शक्‍यतो दुसऱ्या दिवशी लगेच तुम्ही नेहमीप्रमाणे जेवण करू शकतात.

        -दुसऱ्या दिवसापासून कोमट पाण्यात मीठ टाकून दिवसातून तीन ते चार वेळा हळुवारपणे गुळण्या कराव्यात. तसेच जेवणानंतर सुद्धा गुळण्या कराव्यात जेणेकरून जखमेत अन्न कण अडकणार नाहीत.

        -जखम मोठी असेल आणि डॉक्टरांनी टाके टाकले असतील तर ते काढण्यासाठी एक आठवड्यानंतर यावे.

        ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. भरपूर खा आणि स्वस्थ राहा.

डॉ. स्मितल नितीन पवार

उज्वल दातांचा दवाखाना

नाशिक.


Facebook वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा Ujjwal Dental Clinic Facebook page

LinkedIn वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा drsmital LinkedIn

इतर काही लेख...
रूट कॅनल ट्रीटमेंट का करतात.root canal treatment

खोटे दात कोण कोणत्या प्रकारचे असतात.artificial teeth

1 टिप्पणी:

Please do not enter irrelevant comment.