रविवार, २५ ऑक्टोबर, २०२०

दात काढल्यावर डोळे खराब होतात का??

                

         "माझी दाढ खूप दुखतेय पण मला ती काढायची नाहीये. दुसरा काही इलाज करता येण्यासारखा असेल तर सांगा. दात काढल्यावर डोळे खराब होतात ना? "क्लिनिकच्या दारातून आत येताना समोरच्या खुर्चीवर बसता बसतानाच पेशंट ने त्याच्या मनातली भीती बोलून दाखवली.

         माझ्या मते  हा प्रश्न सर्व दातांच्या डॉक्टरांसाठी नेहमीचाच असेल. या गैरसमजुतीमुळे बरेच जण दात काढायचा तर सोडाच पण दातांच्या दुसऱ्या ट्रीटमेंट पण करण्यासाठी घाबरतात.

        काल-परवाच एका व्हॉट्सऍप ग्रुप मध्ये एक जोक वाचण्यात आला.
        एक गृहस्थ एका डेंटिस्टकडे गेले आणि त्यांना म्हणाले की माझा दात खूप हलतोय. पण मला काढायचा नाही. दात काढून टाकला तर माझे डोळे खराब होतील.
असा कोणता उपाय आहे का ज्याने माझा दात आपोआप पडून जाईल?
      डॉक्टर म्हणाले की उपाय सोपा आहे. डोळ्यांच्या डॉक्टरांकडे जाऊन डोळे काढून या. दात आपोआप पडून जातील.
      तर पेशंट हसून म्हणाला ,"शी.... किती खराब दिसेन मी डोळे काढलेला. त्यापेक्षा तुम्ही दातच काढून टाका."
   
         वरच्या जोक मध्ये डॉक्टरांनी सांगितलेला उपाय प्रत्यक्षात आणता येण्यासारखा नाही हे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे. कारण डोळे खराब झाले तरी त्याचा आपल्या दातांवर काहीही फरक पडत नाही. पण मग या हिशोबाने तर दात काढले तर डोळ्यांवर देखील काहीच फरक पडायला नको. मग अशी समजूत का प्रचलित झाली असेल की दात काढले की डोळे खराब होतात?
           
          या प्रचलित समजुती मागे दोन - तीन कारणे असावीत असे मला वाटते.

१) वयाच्या चाळिशीनंतर शरीरात कॅल्शियम ची कमतरता होण्यास चालू होते. त्यामुळे बऱ्याच लोकांच्या दातांच्या समस्या चालू होतात आणि  दात काढण्याची गरज पडते. परंतु याच वयात डोळ्यांच्या समस्यादेखील चालू होतात. नजर कमी होणे हा वयाच्या चाळिशीनंतर चा सर्वसाधारण त्रास आहे. म्हणून बऱ्याच लोकांना वाटते की दात काढल्यामुळे नजरेवर परिणाम झाला.

२) वरच्या दाताचे दुखणे व सूज हे गालाच्या हाडापर्यंत तसेच डोळ्याच्या खालच्या भागापर्यंत पसरते. वरच्या दातांची सूज ही डोळ्यांच्या खालच्या पापण्यांपर्यंत पसरू शकते. सूज आल्या नंतर तो डोळा कमी उघडला जाऊ शकतो. म्हणून कदाचीत पूर्वीच्या लोकांनी डोळ्यांचा आणि दातांचा संबंध लावला असावा.


३) पूर्वीच्या काळी भूल देण्यासाठी जे औषध वापरत होते ते डोळ्यांच्या जवळ आल्यास डोळे लाल होणे, डोळ्यांची जळजळ होणे हे प्रकार होत होते. म्हणून दात काढल्यानंतर डोळे खराब होतात असे म्हंटले जात असावे.

              आत्ताच मला चष्मा लागला आहे तर माझे दात खराब झाले असतील का हे विचारणारा एकही पेशंट मला माझ्या एवढ्या वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये एकदाही भेटला नाही. जर दात काढल्यामुळे डोळे खराब होत असतील तर डोळ्यांचं ऑपरेशन झाल्यावर दात देखील खराब व्हायला पाहिजेत.  
        बरीच अशी लहान मुले आहेत की ज्यांना चष्मा आहे परंतु त्यांचा एकही दात पडलेला नाही आणि बरेच असे वृद्ध व प्रौढ व्यक्ती सुद्धा आहेत की ज्यांचा एकही दात शिल्लक नाही परंतु तरी त्यांना अजून चष्मा नाही.

         दात काढल्यावर डोळे खराब होतात याला कोणताही शास्त्रीय आधार नाही. डोळ्यांच्या आणि दातांच्या नसा मेंदूमध्ये वेगवेगळ्या ठिकाणाहून जातात. आणि त्यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. "पूर्वीचे लोक म्हणतात." या सबबीखाली पाळण्यात आलेल्या गैरसमजुती पैकी हीदेखील एक गैरसमजूत आहे. दात काढल्यावर डोळे खराब झाले असते तर कोणत्याही दातांच्या डॉक्टरांनी दात काढण्याचा सल्ला दिला नसता किंवा असा सल्ला देताना त्याचे डोळ्यावर होणारे दुष्परिणाम नक्कीच सांगितले असते.
  
         त्यामुळे पहिले तर कोणीही दात काढायला लागावा एवढं दातांकडे दुर्लक्ष करूच नका आणि त्यातही दात काढण्याची गरज लागल्यास "दात काढल्यामुळे डोळे खराब होतात" या भीतीमुळे दाताची ट्रीटमेंट पुढे ढकलू नका. दातांची ट्रीटमेंट न केल्यामुळे आपलाच त्रास आणि त्यानंतर दातांच्या ट्रिटमेंट वर होणारा खर्च वाढतो.

        कसा वाटला हा लेख जरूर कळवा आणि अजून काही प्रश्न विचारायचे असल्यास कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकतात. भरपूर खा आणि स्वस्थ राहा.

डॉ. स्मितल नितीन पवार

उज्वल दातांचा दवाखाना

नाशिक

मला फेसबुक वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा.               

  ujjwal dental clinic Facebook                           

मला लिंक्डइनवर फॉलो करण्यासाठी क्लिक करा.            

drsmitallinkedin                                                

माझे दुसरे काही लेख....

दातांमधील फट कशी बंद करता येईल??

खोटे दात बसवायचे आहेत. कोणते बसवू??

रूट कैनाल ट्रीटमेंट का करतात??