रविवार, ३१ मे, २०२०

पांढरे दात

        " माझे दात खूप पांढरे होते हल्ली खूप पिवळे पडायला लागलेत. काही करता येईल का डॉक्टर?" नेहमी कानावर पडणारा पेशंट चा प्रश्न.
      "हो.. का नाही?" माझं नेहमीचं उत्तर...
        मोत्याच्या दाण्यासारखे पांढरे शुभ्र दात कोणाला नाही आवडणार आणि याचाच फायदा घेतात टूथब्रश टूथपेस्ट कंपनीवाले. यात खरं काय खोटं काय ते आज मी तुम्हाला सांगणार आहे.
        दाताच्या सगळ्यात वरचं आवरण असतं जे सगळ्यात पांढरं असतं. दात पिवळे दिसतात म्हणजे एकतर हे आवरण निघून जातं नाहीतर झाकलं जातं. हे आवरण निघून जायला खूप कारण आहेत. असे दात सफेद करायला खूप प्रकारच्या ट्रीटमेंट येतात. ते मी पुढच्या लेखात सविस्तर सांगेन आणि आवरण झाकले गेले याचं प्रमुख कारण म्हणजे दात नीट न घासणे. आता यात पण दाताच्या वरची साचलेली घाण मऊ असेल तर ब्रश ने सहज निघते आणि दात पांढरे होतात. हीच घाण खूप दिवस दातांवर तशीच राहिली तर दाताच्या आजूबाजूला जमते. घट्ट होते आणि अजून पिवळी पडते. ही घाण आपण ब्रश ने काढू शकत नाही. ती डेंटिस्ट कडे जाऊन मशीन ने काढावी लागते. यानंतर तुमचे दात स्वच्छ आणि पांढरे दिसू लागतात.
          दात पांढरे करणाऱ्या पेस्ट बाजारात मिळतात त्याने दात पांढरे होतात असा दावा कंपनी करतात. पण या पेस्ट मध्ये असणाऱ्या केमिकल ची आपल्या दातावर रिअँक्शन होते म्हणून त्याचा रंग शुभ्र होतो. थोड्या अवधी साठी अशी टूथपेस्ट आपण वापरू शकतो पण नेहमीसाठी वापरल्यास त्याचा दुष्परिणाम दिसून येतो.
          जोर लावून दात घासून पांढरे करूया असा विचार करत असाल तर आताच थांबा. याने उलट दातांच्या वरचं आवरण निघून जाते आणि दात अजूनच पिवळे दिसतात.
            चला तर मग... आजपासून दात खूप घासून त्यांना पांढरे बनवण्यासाठी मागे लागण्यापेक्षा हळूवार नीट घासून स्वच्छ ठेऊ.


                                                  डॉ. स्मितल नितीन पवार
                                                 उज्ज्वल दातांचा दवाखाना
                                                 नाशिक.